पाच वर्षांपासून दुरुस्त न झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे महाराष्ट्र, विजापूर, गोवा, बेळगाव आणि इतर शहरांना जोडणारे प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खराब झालेल्या रस्त्यांमुळे लोकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. विशेष म्हणजे, अशा रस्त्यांवरून गर्भवती महिलांना प्रवास करणे भाग पडत आहे. आमदार आनंद न्यामगौडा यांच्या काळात अर्धा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता, मात्र पावसाळ्यात तो पुन्हा खराब झाला. संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्यास दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. आतातरी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे बुजवण्यासाठी पावले उचलतील अशी आशा आहे.
या रस्त्याबाबत बोलताना एका स्थानिक व्यापाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘गेली पाच-सहा वर्षे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. आमदार आनंद न्यामगौडा यांच्या काळात निधी आल्यावर अर्धाच रस्ता दुरुस्त केला गेला. या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी धाडस लागतं, नाहीतर हात-पाय तुटणे निश्चित आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या गर्भवती महिलांची अवस्था तर सांगण्यासारखी नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडून अनेकजण जखमी झाले आहेत. या रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे दुचाकी घसरून माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments