धारवाड जिल्ह्यात हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने, सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, गुरुवारी रेड अलर्ट असल्याने अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा, तसेच पीयूसी आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत धारवाड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. यामुळे आज शुक्रवारीही सुट्टी कायम ठेवण्यात आली आहे. हवामान विभागाने शुक्रवारीही जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी संध्याकाळी धारवाड जिल्ह्यातील हुबळी, धारवाड, कलघटगी, अळणावर, कुंदगोळ, नवलगुंद, आणि अण्णीगेरी या बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाने चांगलेच थैमान घातले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, अंगणवाड्या, पीयूसी आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारीही, सुट्टी कायम ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी दिला आहे. तसेच, सततच्या पावसामुळे अनेक नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असल्याने, नागरिकांनी सुरक्षिततेचे उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
धारवाड जिल्ह्यातील बेंनी हळा आणि तुप्परी हळा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे, या नद्यांच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Recent Comments