‘अर्धवट वेड्यांबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही,’ अशा शब्दांत मंत्री लक्ष्मण सवदी यांनी माजी मंत्री रमेश जारकिहोळी आणि वादग्रस्त पुस्तकाचे लेखक रवी हंज यांच्यावर जोरदार टीका केली. अथणी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोघांवर एकेरी भाषेत निशाणा साधत पुस्तक जप्त करण्याबाबत सरकार ठाम असल्याचे स्पष्ट केले.
अथणी जिल्हा घोषणेच्या मुद्द्यावर लक्ष्मण सवदी संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सवदी म्हणाले, वेड्यांबद्दल बोलू नका, असे आधीच सांगितले आहे. पुन्हा त्याच व्यक्तीबद्दल विचारता? अर्धवट वेड्यांबद्दल काहीही विचारू नका. अशा लोकांची चर्चा करणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

रवी हंज यांच्या वादग्रस्त पुस्तकामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नावर सवदी यांनी असा कोणत्याही संघटनेचा संबंध नसल्याचे सांगितले. काही तासांत प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी काही वाक्यांचा विपर्यास करून लिखाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘तो एक वेडा, तर हा एक मूर्ख’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. अशा मूर्खपणाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला विचारवंतांच्या पंक्तीत बसवू नका. अशा लोकांवरील चर्चा थांबवा, असे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले.
वादग्रस्त पुस्तक जप्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका लेखक रवी हंज यांनी घेतली होती. यावर सवदी यांनी सरकारने कायदेशीर चौकटीत कारवाई सुरू केली असून, संबंधित लेखकाविरोधात एफआयआर दाखल करून पुस्तक जप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. लेखक सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले तरी सरकार त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या मागण्यांबाबतही सवदी यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच विनंती केली असून, आगामी अधिवेशनात त्यांच्या समस्यांवर निश्चित तोडगा काढला जाईल. त्यामुळे आशा भगिनींनी संयम राखून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments