अथणी शहरात लहान मुलांना भिक्षावृत्तीसाठी वापरले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याच्या वयात चिमुकली मुले रस्त्यावर भिक्षा मागत असून, पोलीस ठाण्यासमोरच असे प्रकार दिसत असल्याने बाल संरक्षण व्यवस्थेच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एका हातात लहान बाळ आणि दुसऱ्या हाताने भिक्षा मागणारी महिला, तर आसपास भिक्षा मागणारी लहान मुले अशी दृश्ये अथणी शहरात दिसत आहेत. शिक्षण, खेळ आणि बालपण अनुभवण्याच्या वयात मुलांना भिक्षा मागण्यास प्रवृत्त केले जात आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

महिला व बालकल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून, बालहक्क संरक्षण, शिक्षण, पोषण आणि सुरक्षिततेसाठी कायदेशीर तरतुदीही आहेत. मात्र, शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मुले भिक्षा मागत असताना संबंधित विभागांचे लक्ष जात नसल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
या मुलांना भिक्षावृत्तीत ढकलणारे कोण आहेत, त्यामागे काही टोळी कार्यरत आहे का आणि मुलांच्या कौटुंबिक परिस्थितीचा नेमका तपशील काय आहे, याची महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे चौकशी करावी. मुलांना भिक्षावृत्तीतून बाहेर काढून शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित जीवन मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मुलांना भिक्षा देऊन पुढे जाण्याऐवजी त्यांना शिक्षण आणि सुरक्षित भविष्य मिळण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. अथणीतील भिक्षा मागणाऱ्या बालकांच्या परिस्थितीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे बालपण सुरक्षित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Recent Comments