बेंगळुरूच्या क्रांतीवीर सांगोळी रायण्णा रेल्वे स्थानकावर शनिवारी आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी संयुक्तपणे हिरवा झेंडा दाखवून ‘गोल्डन चॅरियट’ या आलिशान पर्यटन रेल्वेच्या नव्या हंगामाचा प्रारंभ केला.

राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य जगासमोर मांडणाऱ्या या रेल्वेच्या पहिल्या प्रवासाची सर्व तिकिटे पूर्णपणे बुक झाली आहेत. स्पेनसह विविध देशांतील परदेशी पर्यटक आणि देशातील प्रमुख प्रवासी या सुवर्ण यात्रेत सहभागी झाले आहेत. आयआरसीटीसी आणि कर्नाटक पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही रेल्वे चालवली जात आहे.


म्हैसूर येथील रेल्वे कारखान्यात या रेल्वेचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून, डब्यांमध्ये स्वतंत्र ‘लिव्हिंग रूम’ आणि ‘बेडरूम’ची सोय करण्यात आली आहे. दक्षिण भारतातील होयसाळ, चालुक्य आणि विजयनगर साम्राज्यांच्या वास्तुकलेवर आधारित डब्यांची अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे मध्यपूर्वेतील सुरक्षा संकटामुळे अडकलेल्या कर्नाटकातील ६०० हून अधिक उमरा यात्रेकरूंना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.



Recent Comments