Belagavi

दुर्ग महिपाळगडावर दसरा महोत्सव उत्साहात संपन्न…!

Share

गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, बेळगाव विभाग यांच्या वतीने दुर्ग महिपाळगड येथे ‘आधी तोरण गडाला… मग घराला…!’ या संकल्पनेतून दसरा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला…

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घराला तोरण बांधण्यापूर्वी स्वराज्याच्या साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांना तोरण बांधावे, त्यांची स्वच्छता करावी आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी योगदान द्यावे, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे.

महिपाळगड येथे आयोजित महोत्सवानिमित्त किल्ल्याच्या ऐतिहासिक महाद्वाराची स्वच्छता करून ते आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. महाद्वाराला सुंदर व भव्य तोरण बांधण्यात आले. यावेळी विधिवत कलशपूजा आणि शस्त्रपूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, बेळगाव विभाग यांच्या वतीने करण्यात आले. विभागाच्या अध्यक्षा सौ. गार्गीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत महिपाळगड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

‘आधी तोरण गडाला… मग घराला…!’ ही केवळ दसरा साजरा करण्याची संकल्पना नसून, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाप्रती आदर व्यक्त करण्याची आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करत नव्या पिढीमध्ये गड-किल्ल्यांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महिपाळगडावरील या दसरा महोत्सवातून संस्थापक अध्यक्ष श्री. योगेश सोनवणे यांच्या संकल्पनेला बेळगाव विभागाने कृतीतून प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

— गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, बेळगाव विभाग

Tags: