Belagavi

राणी चन्नम्मा विद्यापीठात एनएसएस पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

Share

सामाजिक विचार आणि निस्वार्थ सेवेच्या माध्यमातूनच तरुण पिढी सुदृढ आणि सक्षम राष्ट्र घडवू शकते, असे प्रतिपादन भारत सरकारच्या बंगळुरू येथील एनएसएस प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक गिरीधर उपाध्य यांनी केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विद्यासंगम परिसरातील कुवेंपू सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे आयोजित ‘राणी चन्नम्मा पुरस्कार प्रदान सोहळा’ आणि ‘एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सेवाभावी वृत्ती रुजवण्यात कार्यक्रम अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बंगळुरूचे राज्य एनएसएस अधिकारी डॉ. प्रताप लिंगय्या म्हणाले की, राज्यभरात एनएसएसचे उपक्रम अत्यंत सक्रियपणे राबवले जात आहेत. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे अधिकाऱ्यांना नवे बळ आणि मार्गदर्शन मिळते.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी भूषवले. विद्यापीठाचे एनएसएस विभाग ग्रामीण विकास आणि जनजागृती उपक्रमांमध्ये आघाडीवर असल्याचे सांगत पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या एनएसएस अधिकारी व स्वयंसेवकांना ‘राणी चन्नम्मा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास विद्यापीठाचे वित्त अधिकारी प्रा. बी. एस. नावी, तेलंगणातील महात्मा गांधी विद्यापीठाचे प्रा. रवी अकुला, एनएसएस समन्वयक डॉ. कणकप्पा पूजार, डॉ. संजीव तळवार, डॉ. सुरेश हनगंडी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: