विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी येथे ऐतिहासिक श्री राऊतराय यात्रा महोत्सव अत्यंत भक्तीभावाने पार पडला. या सोहळ्यात वर्तवलेल्या भाकिताने उपस्थितांचे व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, ‘पाऊस पडला नाही म्हणून खचून जाऊ नका, भरपूर पाऊस पाडून सांभाळ करेन’ या भाकितामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाकितात पुढे सांगण्यात आले की, पाऊस लांबल्याने धैर्य सोडू नका, योग्य वेळी पाऊस देऊन रक्षण करीन. याचबरोबर ‘दोन बॉम्ब पडतील, सावध रहा’ असा युद्धाच्या परिस्थितीबाबत सावधगिरीचा इशाराही देण्यात आला. तसेच, “शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे, पण कितीही अडचणी आल्या तरी हात धरून सांभाळेन” असे सांगत शेतीसमोरील संकटांवर भाष्य करण्यात आले.
विजयादशमीनंतर द्वादशीपासून सुरू होणाऱ्या या पाच दिवसांच्या ऐतिहासिक यात्रेत रथाऐवजी खुल्या वाहनात किंवा अश्वावर आरूढ होऊन राऊतरायांची मिरवणूक काढली जाते, हे या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी सहभागी होऊन भंडाऱ्याची उधळण केली. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक उत्सवांपैकी एक असलेल्या या यात्रेत श्री राऊतराय आणि गंगेमाळम्मा यांचा विवाह सोहळाही पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.

वार्ताहर:
विजयकुमार सारवाड
विजापूर


Recent Comments