कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या २०२ व्या विजयोत्सवानिमित्त कित्तूर येथे आयोजित करण्यात आलेली महिलांची बाईक रॅली विशेष आकर्षण ठरली.

ऐतिहासिक कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राणी चन्नम्मा यांना अभिवादन करण्यासाठी महिलांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. हुलीकट्टी क्रॉस येथील मोरारजी देसाई निवासी शाळेपासून या रॅलीला सुरुवात झाली. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात असून, यावर्षीही महिलांनी बाईक रॅलीद्वारे चन्नम्मा यांच्या स्वाभिमान संघर्षाची आठवण ताजी केली.

या रॅलीत शेकडो महिला कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. हुलीकट्टी क्रॉसवरून निघालेली रॅली राणी चन्नम्मा सर्कल येथे पोहोचल्यानंतर तेथील चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री दुर्गम्मा मंदिरात विशेष पूजा व प्रार्थना करण्यात आली.
राणी चन्नम्मा सर्कलवरून पुढे निघालेली बाईक रॅली ऐतिहासिक अराळीकट्टेमार्गे कित्तूर चन्नम्मा किल्ल्याच्या आवारात पोहोचून समाप्त झाली. यावर्षीचा उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी जयघोषात महिलांचे स्वागत केले.


Recent Comments