माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याची परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात होणारी बदली राज्याच्या कारागृह आणि सुधारसेवा विभागाने तात्पुरती स्थगित केली आहे. इतर सात कैद्यांच्या बदलीस मात्र विभागाने संमती दिली आहे.
परप्पना अग्रहारा कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाईल वापरल्याचे प्रकरण गंभीरतेने घेत बेंगळुरू पोलिसांनी प्रज्वल रेवण्णा याच्यासह सात आरोपींची इतर कारागृहात बदली करण्याची शिफारस केली होती. या शिफारशीच्या आधारे प्रज्वल याची बेळगावच्या हिंडलगा कारागृहात बदली करण्याचा आदेश देण्यात आला होता.

दोन महिन्यांपूर्वी सीसीबी पोलिसांनी परप्पना अग्रहारा कारागृहावर छापा टाकला असता प्रज्वल याच्या कोठडीत मोबाईल आणि पेनड्राईव्ह सापडले होते. या प्रकरणी प्रज्वल याच्यासह सात आरोपी आणि कारागृह वर्डन प्रकाश गावे यांना पोलिसांनी अटक केली होती.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट जामीन आदेश तयार केल्याच्या प्रकरणी संशयित कैदी शंकर, आर्मुगम आणि कारागृहाचे प्रथम दर्जा सहाय्यक श्रीकांत यांची इतर कारागृहात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी सोमशेखर यांनाही अटक झाली आहे.
प्रज्वल रेवण्णा याच्या बदलीच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या सोमशेखर याला अटक झाल्यानंतर सुरक्षा आणि देखरेखीच्या दृष्टीने पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी बदली आदेशाचा पुनर्विचार केला आहे. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा याच्या हिंडलगा कारागृहातील बदलीस सध्या तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.


Recent Comments