बेळगाव जिल्ह्यात लोकप्रियतेच्या शिखरावरून ओसरत चाललेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट ब्रिज’ या बौद्धिक खेळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘कर्नाटक राज्य ब्रिज असोसिएशन’ आणि ‘ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सहकार्याने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावच्या बुधवार पेठ, टिळकवाडी येथील ‘टिळकवाडी क्लब’च्या जुन्या ग्रंथालय इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये हे मोफत कॉन्ट्रॅक्ट ब्रिज प्रशिक्षण शिबिर रंगणार आहे. आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार) सायंकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत हे प्रशिक्षण होणार असून लहान बॅचमध्ये मार्गदर्शन केले जाईल.

मेंदूला उत्तम व्यायाम देणाऱ्या आणि एकाग्रता वाढवणाऱ्या या खेळाच्या शिबिराचे पूर्ण मार्गदर्शन ‘ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया’चे सचिव आनंद सामंत करणार असल्याचे बी.डी.सी.बी.सी.ए. (BDCBCA) चे सचिव एम. आय. हेगडे यांनी सांगितले. या मोफत शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संतोष के. ममदापूर (9449837145), दत्तु पंडित (9448140726) आणि एच. डी. काद्रोळकर (9845274931) यांच्याशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत. ऑक्टोबरच्या मध्यभागापासून टिळकवाडी येथे होणाऱ्या या शिबिरात इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि निवृत्त नागरिक सहभागी होऊ शकतात.


Recent Comments