शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल या युट्युबवरील जाहिरातीवर विश्वास ठेवून बेळगावातील हिंदवाडी येथील रहिवासी किशोर (वय ६०) यांची २१,९३,९९९ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहरातील सीईएन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
गेल्या २० जून रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने प्रसारित झालेली शेअर गुंतवणुकीची जाहिरात किशोर यांनी पाहिली होती. जाहिरातीतील लिंकद्वारे नाव आणि पत्ता नोंदवून त्यांनी नोंदणी केली. त्यानंतर संदीप शर्मा नावाच्या व्यक्तीने फोन करून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट केले.

त्यानंतर प्रियांश शर्मा नावाच्या व्यक्तीने फोनपेद्वारे २२ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. अधिक रक्कम गुंतवल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून वेबसाईटद्वारे टप्प्याटप्प्याने बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेण्यात आली. मात्र गुंतवलेली रक्कम आणि नफा दोन्ही न देता फसवणूक केल्याचे किशोर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एकूण २१,९३,९९९ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले असून सीईएन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Recent Comments