Belagavi

राज्य सरकारची एक्स्ट्रा एक्सपायरी जवळ आली आहे: आमदार अभय पाटील यांची टीका

Share

राज्य सरकार पूर्णपणे रुळावरून घसरले असून सरकार आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झाले आहे. विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली असून राज्य सरकारची एक्सपायरी समीप आली आहे, असा टोला बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी लगावला.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तातडीने ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या तीन वर्षांत शहरासाठी विशेष विकास निधी आलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेला मिळणारा अर्ध्याहून अधिक निधी सरकारने रोखला आहे, असा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १४०० घरांपैकी १००० घरांची मंजुरी सध्याच्या सरकारने रद्द केली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेला निधी दिला जात नाही. सध्याच्या प्रशासनाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून कोणतीही कामे होत नाहीत, असे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

या प्रसंगी विधान परिषद आमदार एन. रविकुमार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: