Belagavi

दुष्काळाच्या मुद्द्यावरून आमदार एन. रविकुमार यांची काँग्रेसवर टीका

Share

राज्यात पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले असतानाही सरकार दुष्काळ जाहीर न करता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विधान परिषद आमदार एन. रविकुमार यांनी केला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दुष्काळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास सभागृहात आणि बाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. बेळगाव जिल्ह्यातील यारगट्टी, रामदुर्ग आणि कटकोळसह अनेक भागात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

मुग, कापूस, मका आणि भुईमुगाची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून रामदुर्ग परिसरात पिण्याच्या पाण्याअभावी मोठी समस्या निर्माण झाली आहे. चंदरगी तलाव भरणे आणि सालापूर उपसा सिंचन योजना सुरू न झाल्यामुळे ६० हून अधिक गावांना फटका बसला आहे. शेतकरी गंभीर संकटात असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी नाराजांची भेट घेत असल्याची टीका रविकुमार यांनी केली.

सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून प्रति एकर ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी जेडीएसच्या पदयात्रेपासून भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र दूर राहिल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना रविकुमार यांनी, पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी आधीच चर्चा करूनच विजयेंद्र शिकारीपूरला गेल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: