Chikkodi

चिकोडीत कृष्णा नदीच्या पाण्यावरून तीव्र आंदोलन

Share

महाराष्ट्राकडून कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्याच्या राधकृष्णा एत सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्यामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने नदीकाठी महाविशाल आंदोलन करण्यात आले. इचलकरंजीजवळ पंचगंगा नदी वाहत असतानाही महाराष्ट्राने कर्नाटक हद्दीतील दानवाड-यडूर-कल्लोळ-चंदूर संगम क्षेत्रातून पाणी नेण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कल्लोळ बॅरेजमधील जलसाठा घटून चिकोडी व निपाणी तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्राशी चर्चा करून शेतकरी व नागरिकांच्या हिताचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. सरकारच्यावतीने वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा कित्तूर कर्नाटक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महादेवा तळवार आणि तालुकाध्यक्ष नागेश माळी यांनी दिला असल्याचे एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: