दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराला ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि काँग्रेस पक्षच थेट जबाबदार असल्याचा आरोप करत धारवाडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.

हुबळी-धारवाड महानगर जिल्हा भाजप घटकाच्या नेतृत्वाखाली धारवाड येथील सुभाष रस्त्यावरील भाजप कार्यालयापासून ते विवेकानंद चौकापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टीचे नेते करत असून, दिल्लीतील जंतर-मंतरवरील हिंसाचार याचे ताजे उदाहरण असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसकडून सातत्याने हिंसाचार व दंगली घडवण्याचे कारस्थान रचले जात आहे; मात्र देशातील जनता काँग्रेसला नेहमीच योग्य धडा शिकवत आहे, असा घणाघात भाजप नेत्यांनी केला. परदेशी निधीचा वापर करून कॉकरोच जनता पार्टीचे नेते देशातील शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोपही या वेळी करण्यात आला.
विद्यार्थी आणि तरुण वर्गाने अशा नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करत भाजप नेत्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर आधीच द्वेष पसरवणारी वक्तव्ये व्हायरल झाली आहेत. त्यामुळे काँग्रेस व कॉकरोच पार्टीच्या नेत्यांपासून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. तसेच दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.


Recent Comments