Belagavi

बेळगावात अभिनयासह रंगसंगीत प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ!

Share

कर्नाटक शासनाचा ‘कन्नड आणि संस्कृती विभाग’ आणि ‘व्यावसायिक रंगभूमी रंगायण, दावणगेरे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ दिवसांच्या ‘अभिनयासह रंगसंगीत प्रशिक्षण कार्यशाळे’चा गुरुवारी शहरातील बसवराज कट्टीमणी सभागृहात मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.

व्यावसायिक रंगभूमी रंगायणचे संचालक मल्लिका अर्जुन कडकोळ यांनी दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेचे उद्घाटन केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, “व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय, रंगसंगीत आणि नाट्यसंगीत या समृद्ध परंपरा असून, त्यात रंगसंगीताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.”

उत्तर कर्नाटकात हिंदुस्तानी संगीताला मोठे स्थान आहे, तर दक्षिण कर्नाटकात कर्नाटक संगीताची परंपरा जपली गेली आहे. म्हणूनच जुन्या व्यावसायिक नाटक कंपन्यांच्या नावात ‘नाट्य संगीत मंडळी’ असा उल्लेख केला जायचा, असे त्यांनी सांगितले.

व्यावसायिक रंगभूमीची ही संगीत परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दावणगेरे रंगायणने यापूर्वी दावणगेरे व म्हैसूर येथे यशस्वी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. आता बेळगाव विभाग स्तरावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

बसवराज कट्टीमणी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. वाय. बी. हिम्मडी यांनी व्यावसायिक रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. शिबीर संचालक राजाप्रभू धोत्रे यांनी कार्यशाळेचे स्वरूप स्पष्ट केले.

बेळगाव विभागातून निवड झालेल्या २० प्रशिक्षणार्थींना १५ दिवस अभिनयासह रंगसंगीताचे धडे दिले जातील. तसेच शिबीराच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकार रंगसंगीताचे जाहीर सादरीकरण करतील, अशी माहिती देण्यात आली.

प्रारंभी शिबीर संयोजक एन. नटराज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी व्यासपीठावर कन्नड आणि संस्कृती विभागाचे बेळगाव विभाग संयुक्त संचालक के. एच. चन्नूर, संगीततज्ज्ञ गुरुनाथ कुलकर्णी व मंजुळा शिनगारे-जोशी उपस्थित होते. बसवराज कुप्पसगौडर यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Tags: