Uncategorized

बेळगाव: रामदेव गल्लीत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

Share

बेळगाव शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामदेव गल्ली येथील एका नामांकित सराफी दुकानात आज पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या रामदेव गल्लीतील ‘व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स’ या दुकानावर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून आलेल्या चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरांनी दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरल्याचे समजते.

या घटनेनंतर सुमारे दोन तासांनी दुसऱ्या एका वाहनातून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने दुकानातील काही साहित्य लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. चोराने दुकानातील कोणत्या वस्तू चोरून नेल्या आणि यात नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. नेमकी किती चोरी झाली आहे, याचा सविस्तर तपशील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Tags: