Dharwad

धारवाडमधील ‘त्या’ चिमुरड्याचा जीव धोक्याबाहेर

Share

धारवाड येथील बाराकोटी अपार्टमेंटमधील डॉक्टर हत्या प्रकरणात चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

भूलतज्ज्ञ डॉ. किरण यांची त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या आठ वर्षांच्या नेहीत या मुलावरही चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुलाशेजारीच त्याची आई मोबाईल पाहत बसली होती. नातेवाइकांनी दरवाजा उघडल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा श्वास सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतः त्याला उचलून तातडीने रुग्णालयात दाखल केले. आयुक्तांच्या या तत्परतेमुळेच या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.

सुरुवातीला धारवाडच्या बी. डी. जत्ती रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असून, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेवर धाव घेत मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस आयुक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: