धारवाड येथील एका अपार्टमेंटमध्ये पत्नीनेच आपल्या डॉक्टर पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

धारवाडमधील बाराकोटी येथील पवन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या रनकास्टेलो अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. अनॅस्थेशिया तज्ज्ञ डॉक्टर किरण होनण्णावर (४५) यांची त्यांची पत्नी आणि नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रियांका हिने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका खोलीत किरण यांचा रक्ताळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला, तर दुसऱ्या खोलीत आठ वर्षांचा मुलगा नेहीत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी स्वतः जखमी मुलाला उचलून तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
या घटनेनंतर मृत किरण यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून संशयित आरोपी प्रियांका हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
मंजुनाथ डी, इन न्यूज, धारवाड.


Recent Comments