एसआयआर सर्वेक्षणाचा विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू असून यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, तसेच हेमावती लिंक एक्सप्रेस कॅनॉल प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांनी एसआयआर सर्वेक्षणाविरोधात निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर डॉ. जी. परमेश्वर यांनी तुमकूर येथे भाष्य केले. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जर कुठे नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर निवडणूक आयोग त्यावर योग्य ती कारवाई करेल. यामध्ये राज्य सरकारचा कोणताही सहभाग नसून आम्ही कोणालाही असे आदेश दिलेले नाहीत. आयोगाच्या मागणीनुसार केवळ कर्मचाऱ्यांची मदत पुरवण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बीएलओ अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन अर्ज गोळा करणे आवश्यक आहे, मात्र ते एकाच ठिकाणी बसून चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई करावी, याला आमचा विरोध नाही, असे डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून विरोधी पक्षांच्या तक्रारीची ते स्वतः पडताळणी करतील, आम्ही यामध्ये पडणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी हेमावती लिंक एक्सप्रेस कॅनॉल प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी, सरकारने यापूर्वीच निर्णय घेऊन या प्रकल्पासाठी ९०० कोटींहून अधिक निधी मंजूर केल्याचे सांगितले. प्रकल्पावर आधीच मोठा खर्च झाला असून आता हे काम थांबवणे शक्य नाही, सरकार हा प्रकल्प पूर्ण करणारच, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लिंक कॅनॉलमुळे कोणत्याही जिल्ह्याचे नुकसान होणार नाही. कुणिगल तालुका आमच्याच जिल्ह्यात येत असल्याने तेथे जाणारा जुना कालवा कोणत्याही कारणास्तव बंद केला जाणार नाही. जुना कालवा तसाच राहणार असून नवीन लिंक कॅनॉलचे कामही यशस्वीपणे पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.


Recent Comments