Belagavi

मराठी मतदारांच्या मदतीसाठी म ए समिती सरसावली

Share

बेळगाव येथील कॅम्प आणि वडगाव परिसरात राहणाऱ्या मराठी भाषिक मतदारांसाठी एसआयआर प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी म ए समितीने पुढाकार घेतला असून नागरिकांच्या मदतीसाठी वडगाव येथे दररोज दोन तास विशेष साहाय्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंडमध्ये म ए समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेअंतर्गत घरोघरी दिले जाणारे अर्ज केवळ कन्नड भाषेत असल्याने मराठी मतदारांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी वडगावच्या ज्ञानेश्वर मंदिरात दररोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत म ए समितीचे कार्यकर्ते नागरिकांना मोफत मार्गदर्शन व अर्ज भरण्यास मदत करणार आहेत.

“कन्नड भाषेतील अर्जांमुळे मराठी मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला असून हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही ज्ञानेश्वर मंदिरात मोफत साहाय्य केंद्र सुरू केले आहे. दररोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत आमचे कार्यकर्ते नागरिकांना अर्ज भरण्यासाठी पूर्ण मदत करतील,” असे माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी म्हटले.

“निवडणूक आयोगाचे हे अर्ज केवळ कन्नडमध्ये असल्याने नागरिकांना ते समजत नव्हते. मतदारांचा हक्क डावलला जाऊ नये म्हणून आम्ही हे केंद्र सुरू केले असून, सर्व मराठी बांधवांनी याचा लाभ घ्यावा,” अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश रेडेकर यांनी दिली.

“महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना हे अर्ज भरताना जास्त त्रास होत होता. आमच्या या साहाय्य केंद्रामुळे आता वडगाव परिसरातील प्रत्येक मराठी मतदाराला आपले नाव मतदार यादीत अचूकपणे नोंदवता येणार आहे,” असे माजी महिला नगरसेविका वर्षा आजरेकर यांनी म्हटले.

या बैठकीला युवा कार्यकर्ते सागर पाटील, सुनील बोकडे, विठ्ठल पोळ, कीर्तीकुमार कुलकर्णी, ज्ञानेश्वर मुन्नूर, भाऊराव पाटील, महादेव पाटील यांच्यासह समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: