देशात खाद्यतेलाची आयात कमी करून स्वावलंबन साधण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना लागू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांनी तेलबिया पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.


कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे तुक्कानट्टी कृषी विज्ञान केंद्र आणि कागवाड कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

“भविष्यात आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः तेलबिया पिकवून शुद्ध तेलाचा वापर करावा. बाजारपेठेत कमी दरात मिळणाऱ्या अनेक तेलांमध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त असते,” असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तू मैत्रे यांनी म्हटले.

“देशात खाद्यतेल उत्पादनात स्वावलंबन आणण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे,” अशी प्रतिक्रिया तुक्कानट्टी केंद्राचे कृषी तज्ज्ञ मारुती माळवाडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला शेडबाळ व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
— सुकुमार बन्नूरे, इन न्यूज, कागवाड


Recent Comments