Belagavi

आरटीसी नोंदणीतील विलंबाबाबत ‘या’ समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या आरटीसी (RTC) नोंदणीतील विलंबाचा निषेध करत आज बेळगाव जिल्ह्यातील बड वाल्मिकी बेडर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक २७ एप्रिल १९७८ पूर्वीच्या वन अतिक्रमण जमिनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्या असूनही, त्यांची आरटीसी दस्तऐवजात नोंद करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या विलंबाचा निषेध करत बड वाल्मिकी बेडर समाजाच्या वतीने बेमुदत सत्याग्रह सुरू करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रकरणी केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश असताना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांनुसार कारवाईच्या सूचना देऊनही स्थानिक पातळीवर कोणतीही प्रगती झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. सध्या बैलहोंगल, गोकाक, बेळगाव आणि खानापूर या जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये मंजूर जमिनींच्या आरटीसी नोंदणीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

“नियमांनुसार या मंजूर जमिनींचा तपशील आरटीसीच्या ९ व्या रकान्यात नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी बेकायदेशीरपणे याची नोंद ११ व्या रकान्यात करण्याचा नाहक प्रयत्न करत आहेत. सरकार आणि वनहक्क समितीच्या परिपत्रकानुसार २७ एप्रिल १९७८ पूर्वीच्या सर्व जमिनींची नोंद सक्तीने ९ व्या रकान्यातच झाली पाहिजे आणि पात्र लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी वाल्मिकी नायक संघाचे अध्यक्ष यल्लाप्पा यांनी केली.

या आंदोलनाप्रसंगी बड वाल्मिकी बेडर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: