चिकोडी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळावे या उद्देशाने एजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. येथे वाजवी दरात दर्जेदार शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रसंत आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांनी केले आहे.


चिकोडी तालुक्यातील नेज क्रॉस-शमनेवाडी येथील एजीएम इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चालू शैक्षणिक वर्षापासून सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये बी.ई. पदवी अभ्यासक्रम सुरू झाले असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

महाविद्यालयात अत्याधुनिक इमारत, ६ पीएचडी पदवीधारक प्राध्यापकांसह तज्ज्ञ कर्मचारी, मोफत बस सुविधा आणि वैयक्तिक मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करण्यात आला असून प्लेसमेंट प्रशिक्षण दिले जात आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ‘एसडीएम जैन मठ ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली असून, सध्या वरूर-हुबळी, जमखंडी, शमनेवाडी, बस्तवाड येथे १५ शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. पुढील वर्षापासून या कॅम्पसमध्ये बीबीए, बीसीए, बीएमएस आणि डिप्लोमा अभ्यासक्रम तसेच भविष्यात एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कॉलेजच्या संचालिका भाग्यश्री अलगूरे, प्राचार्य डॉ. आर. के. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. जे. पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments