शासकीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजादेवी तुप्पद यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतरही सीमाभागातील मराठी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या सरोजादेवी तुप्पद यांनी गेल्या ३५ वर्षांपासून सीमाभागातील निपाणी जवळील अडी या गावातील शाळेत शिक्षणदानाचे कार्य केले आहे. निवृत्तीच्या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शासन मला सेवेतून निवृत्त करू शकते, परंतु गेल्या ३५ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक मुलांना कन्नड शिकवून भाषा संवर्धनाचे जे कार्य मी केले, ते मी पुढेही चालू ठेवणार आहे. मी माझ्या गावी परत न जाता येथील मुलांना भाषेचे ज्ञान देणार आहे.


त्यानंतर आयोजित मुख्य समारंभाचे उद्घाटन शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी रोपट्याला पाणी घालून केले. शिक्षण विभागाच्या वतीने प्रमोद मट्टी, सचिन रामनकट्टी, विद्या चंद्रकोडी आणि ममता गुंजार यांनी मुख्याध्यापिका तुप्पद यांचा सत्कार करून गौरव केला. व्यासपीठावर केंद्र मुख्याध्यापक एस. डी. दंडिनवर, निवृत्त शिक्षक रमेश भायनाईक, ए. एस. शिंतरे, शंकरगौडा पाटील, बाळू निपाणी उपस्थित होते.

भायनाईक कुटुंबियांच्या वतीने सौम्या भायनाईक यांनी शिक्षिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांnaa शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला हुक्केरी, निपाणी, अडी आणि धारवाड येथील नातेवाईक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजु बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments