खानापूर तालुक्यातील देगाव गावात हत्तींच्या कळपाने शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या भागातील नारळ, सुपारी, केळी आणि भात पिके हत्तींनी पूर्णपणे उद्ध्वस्त केली असून, वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील दाट वनक्षेत्रात असलेल्या देगाव गावात हत्तींच्या कळपाने दिवसाढवळ्या शेतांवर आणि बागांवर हल्ला चढवला. सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यांच्या बागेत घुसून हत्तींनी नारळ, केळी आणि सुपारीची झाडे उन्मळून टाकली, तसेच शेतातील भात पिकाचेही नुकसान केले. यामुळे आनंद गावडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत शेतकरी प्रकाश धोंड्या यांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली, मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

देगाव आणि परिसरातील पाच गावांमध्ये हत्तींचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खानापूरचे सहायक वनसंरक्षक (ACF) बसवराज वाळद आणि वनक्षेत्रपाल (RFO) यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. योग्य पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आनंद गावडे यांनी दिला आहे.


Recent Comments