हुक्केरी वीज सहकारी संघाने थकबाकीमुळे राजा लखमगौडा जलाशय व्यवस्थापन करणाऱ्या जलसंपदा निगम कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या चार वर्षांपासूनची सुमारे १ कोटी ९८ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

या संदर्भात बोलताना सहकारी संघाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी सांगितले की, २०२२ पासून वीज बिल न भरल्यामुळे जलसंपदा निगमाला अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने संघाच्या हितासाठी हा वीजपुरवठा खंडित करावा लागला.

प्रशासकीय व्यवस्थापनासाठी थकबाकी वसुली अनिवार्य असल्याचे संचालक पृथ्वी कत्ती यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित टप्प्याटप्प्याने बिल भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा, अशी प्रतिक्रिया पृथ्वी कत्ती यांनी दिली.

वीज नसल्यामुळे मुख्य कार्यालयातील संगणक आणि इतर उपकरणे बंद पडून कामकाज ठप्प झाले आहे. या प्रकाराची दखल घेत प्रभारी अधीक्षक अभियंता मकरंद पेडणेकर यांनी कार्यकारी अभियंता जगदीश आणि श्रीमंत कांबळे यांना नोटीस बजावून बिल विलंबाचे कारण विचारले आहे, तसेच सर्व दहा विभागांच्या प्रमुखांना तात्काळ थकबाकी भरण्याचे निर्देश दिले आहेत.
जलाशय परिसरातील अनेक वर्षांपासून रिकाम्या असलेल्या कर्मचारी वसाहतींचे वीज बिल न भरल्यामुळे ही थकबाकी वाढल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे विद्युत संघाने अखेर हे पाऊल उचलले आहे.


Recent Comments