Khanapur

खानापुरात रस्त्यांच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक

Share

खानापूर तालुक्यातील उचवडे-तीर्थकुंडे-जांबोटी संपर्क रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले असून, या दुरवस्थेबद्दल काँग्रेस नेते दीपक कवटणकर यांनी स्थानिक आमदारांना धारेवर धरले.

उचवडे, तीर्थकुंडे आणि जांबोटी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. चिखलात अडकलेली दुचाकी वाहने ग्रामस्थांना खांद्यावरून बाहेर काढावी लागत आहेत. या बिकट परिस्थितीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या भागातून एक लाख मते घेऊन विजयी झालेल्या आमदारांनी जनतेला काय दिले, असा सवाल काँग्रेस नेते दीपक कवटणकर यांनी केला. तीन वर्षे उलटूनही या रस्त्यावर साधी मातीही टाकण्यात आलेली नाही, असा थेट आरोप त्यांनी केला.

या चिखलमय रस्त्यावरून पायी चालणेही अशक्य झाले असून, लोकप्रतिनिधी मात्र या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे दीपक कवटणकर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत म्हटले. या समस्येवर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Tags: