बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. २ कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी पतीची हत्या करणाऱ्या महिलेच्या आईने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. मुलीने केलेल्या या गुन्ह्यामुळे समाजात झालेल्या बदनामीला कंटाळून आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली सुमा मंजरगी ही महिला सध्या तुरुंगात आहे. मुलीच्या या कृत्यामुळे तिची ६५ वर्षीय आई महादेवी बदामी या प्रचंड मानसिक दडपणाखाली होत्या. हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावात राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले.

सुमा मंजरगी हिने तिच्या प्रियकरासह एकूण नऊ जणांच्या मदतीने माजी सैनिक असलेल्या आपल्या पतीची सलाईनमधून विष देऊन हत्या केली होती. २ कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. या गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी सुमासह सर्व आरोपींना अटक केली होती. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाची समाजात मोठी नाचक्की झाली होती, ज्यातूनच महादेवी यांनी हे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments