बेळगाव जिल्ह्यातील अवैध माती उपसा, गांजा, मटका आणि बेकायदेशीर दारूविक्री विरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी अशा प्रकरणात सामील असणाऱ्यांना थेट तुरुंगात धाडण्याचा कडक इशारा दिला आहे.

अथणी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी सांगितले की, शेतकर्यांना त्यांच्या जमिनीच्या सुधारणेसाठी तलावातील माती काढण्याची कायदेशीर परवानगी आहे. परंतु, महसूल, वन किंवा पाटबंधारे विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना केवळ व्यावसायिक फायद्यासाठी मातीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात खाण आणि भूविज्ञान विभागाशी पत्रव्यवहार करून संयुक्त पाहणी केली जाईल.

अवैध कृत्यांचा विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांना धमकावणाऱ्या किंवा त्यांच्यावर दादागिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर तातडीने गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून त्यांची तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढण्यामागे अवैध दारूची विक्री हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी सहज मिळणाऱ्या दारूमुळे तरुण वर्ग गंभीर गुन्ह्याकडे वळत असून, कुडची आणि यमकनमराडी परिसरात नुकतीच मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. मटका आणि जुगार पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध प्रकारांचे व्हिडिओ किंवा फोटो कर्नाटक पोलीस दलाच्या ‘KSP App’ वर थेट पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. या ॲपवरील तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने कोणतीही माहिती लपवणे शक्य होणार नाही. माहिती मिळूनही कारवाई न करणाऱ्या संबंधित बीट कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकांवर विभागीय चौकशी करून शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असे रामराजन यांनी स्पष्ट केले.
अथणी पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार आणि गुन्ह्यांची संख्या विचारात घेऊन, कामकाजाच्या सोयीसाठी या ठाण्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये ‘अथणी शहर’, ‘अथणी ग्रामीण’ आणि स्वतंत्र ‘वाहतूक पोलीस ठाणे’ अशी विभागणी प्रस्तावित असून, नवीन इमारतीसाठी ३० गुंठे जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती रामराजन यांनी दिली.


Recent Comments