राज्य राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले असून उत्तर कर्नाटकातील वजनदार नेते लक्ष्मण सवदी यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी अथणी येथील ग्रामपंचायत अध्यक्षांच्या महासंघाने जोरदार मोहीम उघडली आहे.

उत्तर कर्नाटकातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, माजी उपमुख्यमंत्री तसेच अथणी मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात योग्य स्थान मिळावे, या मागणीसाठी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या महासंघाच्या अथणी विभागाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली.

महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत दरूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन पाळावे अशी मागणी करत सवदी यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यास आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा मोठे यश मिळेल, असा विश्वास श्रीकांत दरूर यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला तालुका महासंघाचे उपाध्यक्ष संजू जमखंडी, भुजबळी हळ्ळूर, श्रीशैल कांबळे, सिद्धराम बडीगेर, बसवराज हणगंडी, शंकर नाईक, बीरप्पा लोकर आणि बसवराज जगदेव यांच्यासह महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments