Khanapur

इटगी ग्रामपंचायत कार्यालयावर नरेगा कामगारांचा धडक मोर्चा

Share

खानापूरमधील इटगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोगूर येथील नरेगा कामगारांनी मजुरी कपातीविरोधात ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. हक्काची दैनंदिन मजुरी थेट अर्ध्यावर आणल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

खानापूर मधील इटगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोगूर गावातील रोजगार हमी योजनेच्या कामगारांनी एकत्र येत आंदोलन केले. नियमानुसार मिळणाऱ्या ३७५ रुपये दैनंदिन मजुरीऐवजी बँक खात्यात केवळ १९० रुपये जमा झाल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. मजुरी कपातीचा निषेध करत कामगारांनी इटगी ग्रामपंचायत कार्यालयाला वेढा घातला. बोगूर येथील ज्येष्ठ नागरिक मकबूल सनदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नंदगड पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनाची माहिती मिळताच खानापूर तालुका पंचायत नरेगाव योजनेच्या सहाय्यक संचालिका रुपाली बडकुद्री, स्थानिक विकास अधिकारी वीरेश सज्जण आणि तांत्रिक सहाय्यक प्रकाश यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. कामगारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहाय्यक संचालिका रुपाली बडकुद्री यांनी निवेदन स्वीकारले. तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार घडला असून यावर लवकरच तोडगा काढून उर्वरित मजुरी दिली जाईल, असे आश्वासन रुपाली बडकुद्री यांनी दिले.

Tags: