राज्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याने विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आलमट्टी धरणातील पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले असून, महाराष्ट्रातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

विजापूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणात सध्या केवळ ४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. दरवर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पश्चिम घाटात होणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि घटप्रभा नद्यांना पाणी येते. मात्र, यंदा पाऊस नसल्याने आगामी दिवसांत नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तलाव आधीच कोरडे पडले असून भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोईना धरणातून कृष्णा नदीत किमान १० टीएमसी पाणी सोडवावे, अशी मागणी होत आहे. सरकारने राजकीय घडामोडींमध्ये वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
पाऊस पडत नसल्याने शेतात पेरणी कशी करावी, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलून महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी आणि कृष्णा नदीत १० टीएमसी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.


Recent Comments