Savadatti

सवदत्तीमध्ये गांजाची तस्करी करणारा गजाआड

Share

सवदत्ती तालुक्यात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका तस्कराला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यामधील हिरूर गावातील एका व्यक्तीकडून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि आरोपीला अटक केली, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सुभाष कुरी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो हिरूर गावातील रहिवासी आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून सुमारे ५८ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सवदत्ती-धारवाड रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वाहनांची तपासणी करत होते. या वेळी संशयित आरोपीची हालचाल संशयास्पद आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्याची कसून झडती घेतली. या तपासणीत आरोपीकडे गांजा सापडला.

या कारवाईत उत्पादन शुल्क निरीक्षक दावलसाब सिंधोगी, सहायक कृषी संचालक शिवप्रकाश पाटील, ग्राम प्रशासकीय अधिकारी रामचंद्र तेक्केवारी, रवी कल्लाम्मनवर यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: