Khanapur

खानापुरात अस्वलाचा हल्ला; शेतात गेलेला तरुण शेतकरी गंभीर जखमी

Share

खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील हुळंद गावात गुरे चारण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात महेश गावडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हुळंद गावचे रहिवासी असलेले महेश गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. संध्याकाळी गुरे घेऊन परतत असताना, दाट झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना अस्वलाच्या नखांच्या आणि दातांच्या वारामुळे त्यांच्या पायाला व कंबरेला गंभीर जखमा झाल्या आहेत. महेश यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावल्याने त्यांना पुढील मोठा धोका टळला आणि अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढला.

रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या महेश यांना उपचारांसाठी तात्काळ खानापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

जांबोटी आणि परिसरातील जंगल भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या भागात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: