Khanapur

खानापुरात बस सेवेसाठी दलित संघर्ष समिती आक्रमक

Share

खानापूर तालुक्यातील आठ गावांना सरकारी बस सुरू करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने आज परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, दुक्कारवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरेपाय, माचाळी आणि गार्ली या गावांमध्ये गेल्या २० वर्षांपासून सरकारी बस धावलेली नाही. यामुळे या भागातील शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना शहरात जाण्यासाठी दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या बेळगाव जिल्हा समितीने आज खानापूर परिवहन बस डेपो व्यवस्थापकांना अधिकृत निवेदन देऊन तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.

सकाळच्या वेळी शाळा सुरू होताना आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत योग्य बस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे जिल्हा संघटन संयोजक राजशेखर शंकर हिंदलगी, प्रमुख रवी मादर, बसवराज मादर, मंजुनाथ मादर, संजय देसाई, सुजाता देसाई, यल्लाप्पा खोत, पुंडलिक दळवी, मनोहर इंदोलकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: