अथणी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उत्खननाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या भागात संयुक्त मोहीम राबवून अवैध उत्खननाविरोधात कारवाई केली आहे.


अथणी तालुक्यातील नागनूर पी. के. गावच्या हद्दीत कृष्णा नदीलगत असलेल्या कर्नाटक जलसंपदा विभागाच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २०४ मधील जमिनीवर हा प्रकार सुरू होता. येथे बेकायदेशीरपणे मातीची वाहतूक करत असताना एक जेसीबी आणि तीन टिप्पर वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच अथणी पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांचा छापा पडताच वाहनचालक वाहने सोडून पसार झाले असून, सध्या पोलीस, महसूल आणि जलसंपदा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अथणीचे तहसीलदार सिद्धराय भोसगी आणि डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांनी दिली आहे.


Recent Comments