विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यात एका पान टपरीमध्ये संशयास्पद स्फोट झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. ममदापूर गावात घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ममदापूर गावातील रविकिरण यांच्या मालकीच्या शेडवजा पान टपरीत हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानाच्या पत्र्याचे शेड हवेत उडाले. घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलिस, अग्निशामक दल, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

प्राथमिक तपासणीत दुकानाच्या आतील फ्रिजला कोणतीही इजा झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा स्फोट टपरीच्या बाहेरील भागातून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
तपास पथकाला घटनास्थळी कोणतीही स्फोटक द्रव्ये आढळून आलेली नाहीत. दरम्यान, काल संध्याकाळी या भागात पाऊस झाल्याने वीज कोसळून हा अपघात झाला असावा का, यादृष्टीनेही तपास अधिकाऱ्यांकडून चाचपणी सुरू आहे. या घटनेचा अचूक कारण शोधण्यासाठी बबलेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments