बैलहोंगल तालुक्यातील दौडवाड मध्ये केवळ १० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून एका व्यक्तीची शेतात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दौडवाड पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास पूर्ण करून पळून गेलेल्या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.


बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील दौडवाड गावात ही घटना घडली असून फकीरप्पा किरकसाली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. फकीरप्पा यांनी संशयित आरोपी हालप्पा जवळी याच्याकडून कामाच्या बदल्यात १० हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली होती, मात्र काम न केल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या संघर्षात झाले आणि संशयितांनी फकीरप्पा यांच्यावर हल्ला केला.

हालप्पा जवळी, मंजू तळवार आणि लक्कप्पा चूनप्पगोळ या संशयितांनी दौडवाड गावाबाहेर फकीरप्पा यांना शेतात गाठून त्यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर मृत फकीरप्पा यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दौडवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments