बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यात एका त्रिकोणी प्रेमप्रकरणाचा थरारक आणि तितकाच धक्कादायक शेवट झाला आहे.


एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या प्रियकराने आणि मुलीच्या भावाने मिळून एका १९ वर्षांच्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

विकास संगप्पा दळवाई असे या खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. विकास आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा हे दोघेही मंगळुरू येथे एकत्र काम करत होते. मात्र, या दोघांनाही हे माहीत नव्हते की ते एकाच गावात राहणाऱ्या एकाच मुलीच्या प्रेमात पडले आहेत. गावात सुरू असलेल्या यात्रेसाठी हे दोघेही एकत्रच गावी आले होते. गावी आल्यानंतर दोघांनाही आपल्या प्रेमप्रकरणाची भणक लागली. याच वादातून २० मे रोजी यात्रेच्या गर्दीतून कृष्णा आणि मुलीचा भाऊ राजू यांनी विकासला गुंगारा देऊन एकांतात नेले आणि त्याचा गेम वाजवला. हत्या केल्यानंतर मृतदेह गोणपाटात भरून, त्याला जड दगड बांधले आणि अनागवाडी पुलावरून थेट कृष्णा नदीत फेकून दिले.
मुलगा बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या विकासच्या पालकांनी बीळगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, घटनेच्या सहा दिवसांनंतर अनागवाडी पुलाजवळ नदीत विकासचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह हाती लागताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून हा प्रकार त्रिकोणी प्रेमातूनच घडल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या आरोपी कृष्णा आणि राजू हे दोघेही फरार असून बीळगी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.


Recent Comments