विजापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या श्री रवींद्रनाथ टागोर सीबीएसई शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १५० रोपांची लागवड करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी नारळाचे रोप लावून या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर शाळा परिसर आणि मैदानावर विविध प्रकारची फळझाडे, सावली देणारी आणि औषधी रोपे लावण्यात आली.

या प्रसंगी बोलताना शाळेचे प्राचार्य अभिजित गायकवाड यांनी, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे जतन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे सांगितले. पर्यावरण प्रदूषण, जंगलतोड आणि वाढते तापमान हे मानवी जीवनासमोरील मोठे आव्हान असून निसर्गाचा समतोल राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित गायकवाड यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, जलसंधारण आणि वृक्षारोपणाची गरज याविषयी जागरूक करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून रोपे आणून ती शाळेला भेट दिली.
“एक विद्यार्थी – एक झाड” या संदेशासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. शालेय आवारात लावलेल्या १५० रोपांची निगा राखण्याची आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव रीता गायकवाड, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार सारवाड, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments