जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हुक्केरी तालुक्यातील सामाजिक अरण्य विभागाने केलेल्या एका संशयास्पद कृत्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन वृक्षलागवड करण्याऐवजी, गेल्या वर्षी लावलेली आणि आता सुस्थितीत असलेली झाडे उपटून त्याच जागी नवीन रोपे लावण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

हुक्केरी शहरातील प्रशासकीय भवनाजवळून जाणाऱ्या बेळवी रस्त्याच्या कडेला गेल्या वर्षी अरण्य विभागाकडून वृक्षलागवड करण्यात आली होती. मात्र, या वर्षाचा कृती आराखडा कागदावर पूर्ण दाखवण्यासाठी आणि सरकारी निधी लाटण्यासाठी अरण्य विभागाने ही सुस्थितीतील झाडे उपटून तिथे नवीन रोपे लावण्याचा सपाटा लावला आहे. हा प्रकार ठेकेदाराचा कारनामा आहे की अधिकाऱ्यांची हातचलाखी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अरण्य विभागाचे अधिकारीच अशी कृत्य करत असल्याने स्थानिक जनतेतून संताप व्यक्त होत आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अरण्य संपत्तीचे नुकसान करणाऱ्या या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

हुक्केरी येथील सामाजिक अरण्य विभागाच्या कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांची वानवा असून केवळ ‘ड’ गटातील कर्मचारीच तिथे पाहायला मिळतात. नुकतेच रुजू झालेले नवीन अधिकारी कार्यालयात फिरकतच नसल्याची माहिती समोर आली आहे.
वृक्षलागवडीसाठी सरकार दरवर्षी मोठा निधी मंजूर करते, मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या पैशांचा अपव्यय होत आहे. या संपूर्ण गैरप्रकारावर अरण्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूक संमती दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, वरिष्ठांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हुक्केरीतील नागरिक करत आहेत.


Recent Comments