Vijayapura

गरज पडल्यास तुरुंगात जाण्यासही तयार; आमदार यत्नाळ यांचा इशारा

Share

विजापूरमध्ये शाळा-महाविद्यालयांत हिजाबच्या बदल्यात विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सरकार आणि पोलीस प्रशासनावर राजकीय हल्लाबोल करताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हिजाबला परवानगी दिल्यास भगव्या शालीलाही परवानगी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिस्तीचे प्रतीक म्हणून गणवेश पद्धती लागू आहे; मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कार्यकाळात हिजाब घालण्यास परवानगी दिल्याचा आरोप बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला. हिजाब संदर्भातील आदेश लागू झाला, त्याच वेळी हिंदू विद्यार्थ्यांना भगवी शाल आणि कपाळाला टिळा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सरकारने हा आदेश मागे घ्यावा यासाठीच विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटण्यात येत होती, मात्र पोलिसांनी आपल्याला गुन्हेगारासारखी वागणूक देत अटक केल्याचा आरोप बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.

राज्य सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असून आपण शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो, असा दावा त्यांनी केला. राज्यात भगवी शाल घालणे किंवा कुंकू लावणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस सरकारने हेच धोरण सुरू ठेवल्यास पश्चिम बंगालप्रमाणे कर्नाटकातही जनता काँग्रेसला धडा शिकवेल आणि २०२८ च्या निवडणुकीत काँग्रेस पूर्णपणे नामशेष होईल, असे भाकीत बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी वर्तवले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान चालते, कोणत्याही व्यक्तीचे किंवा पक्षाचे नाही, असे सांगत त्यांनी अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचे राजकारण सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. हिंदूंचे आंदोलन आणि धार्मिक कार्यक्रमांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही, गरज पडल्यास तुरुंगात जाण्यासही तयार असल्याचे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने भगवी शाल घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे, असे आवाहन त्यांनी केले. हिजाबशी संबंधित आदेश सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा इशारा बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला.

Tags: