Kittur

गोहत्येच्या निषेधार्थ कित्तूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यात गोहत्या आणि गोरक्षकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित या बंद दरम्यान कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक किल्ल्यासमोर एकत्र येत तीव्र निदर्शने केली.

तालुक्यात गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा आणि त्यांच्यावरच नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा निषेध करत शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. गोहत्या रोखणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत आणि गोरक्षणासाठीचा हा लढा कोणत्याही दबावाशिवाय सुरूच राहील, असे प्रतिपादन हिंदू नेते पुनीत केरेहळ्ळी यांनी आंदोलनात बोलताना केले.

या वेळी कित्तूर मतदारसंघाचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी आंदोलनात सहभागी होत कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करायचा असल्यास आधी माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे आव्हान त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिले.

आंदोलनानंतर कित्तूरचे तहसीलदार कलगौड पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यापुढे तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कडक पावले उचलली जातील, असे आश्वासन तहसीलदार कलगौड पाटील यांनी दिले.

Tags: