Bagalkot

आरसीबीच्या विजयानंतर बागलकोटमध्ये तुंबळ हाणामारी

Share

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरू संघाने मिळवलेल्या विजयानंतर बागलकोटमध्ये मोठा हायड्रॉमा पाहायला मिळाला. एकीकडे क्रिकेट चाहते जल्लोष करत असतानाच, दुसरीकडे दोन गटांत झालेल्या वादाचा भडका उडाला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

बेंगळुरू संघाचा विजय निश्चित होताच बागलकोटमधील प्रमुख चौकांमध्ये क्रिकेट चाहते एकत्र आले आणि त्यांनी आरसीबीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मध्यरात्रीपर्यंत आनंद साजरा केला. शहरातील एका हॉटेलमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर सामना पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींनी विजयाच्या क्षणी एकच जल्लोष केला. मात्र, या आनंदाच्या वातावरणातच बागलकोटमधील विद्यगिरी चौकात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक अनुचित घटना घडली.

विद्यगिरी चौकात शेकडो युवक विजयोत्सवासाठी जमा झाले असताना काही युवकांच्या अतिरेकी वर्तनामुळे दोन गटांत अचानक वाद सुरू झाला. घटनास्थळी पोलीस हजर असतानाच दोन्ही गट परस्परांना भिडले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. वाद वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत युवकांच्या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या हाणामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags: