हिडकल धरणग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाचा निषेध करण्यासाठी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात खानापूरमध्ये आंदोलन करण्यात आले.

खानापूर तालुक्यातील नेरसे येथे हिडकल धरणग्रस्तांसाठी मंजूर ४ एकर जमिनीवर एका कुटुंबाने बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खानापूर तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, वाल्मिकी राज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंगीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी संतप्त आंदोलकांनी शासनाचा निषेध करत थेट तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

अतिक्रमण झालेली जमीन पूर्णपणे मुक्त करून स्मशानभूमीशी संबंधित आर. एस. नंबर ४३ आणि ३७ ब चे उतारे तसेच डायरी उताऱ्यातील चुका त्वरित दुरुस्त कराव्यात, तोपर्यंत लढा थांबणार नाही आणि मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे महेश शिंगीहळ्ळी यांनी म्हटले .
या प्रसंगी संघटनेचे प्रमुख नेते महेश शिंगीहळ्ळी, कमल पूजारी, लक्ष्मण बागडी, राजू नाईक, आनंद उद्दी, बाबू हत्तरवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments