विजापूर मधील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बेळगाव विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.


जमीन आणि कौतुंबिक वादामुळे भीमा तीरावर गेल्या चार दशलकांपूर्वी भैरगोंडा आणि चडचण कुटुंबात सुरू झालेले हत्याकांड अनेक जीव गेले तरी अद्याप थांबलेले नाही. या दोन्ही कुटुंबांमधील वादामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. यापूर्वी तत्कालीन आयजीपी आलोक कुमार यांनी दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश आले नाही. काल झालेल्या या भयानक घटनेने भीमा तीरावरील क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे.

गोविंदपूर येथील शेतात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हे हत्याकांड घडले. यामध्ये दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रकांत निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर अत्तार यांचा मृत्यू झाला आहे. तर अरविंद कटगे आणि जेसीबी ऑपरेटर संदीप माने हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विजापूर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २०१५ मध्ये गोविंदपूर येथील शिवानंद तळवार याने एका मुलीचे अपहरण केले होते, ज्याचा राग म्हणून शशिकांत तेली, प्रशांत तेली, कामनिंग तेली आणि महादेव तेली यांनी मिळून शिवानंदची हत्या केली होती आणि ते कारागृहाची शिक्षा भोगत होते. या काळात तेली कुटुंबाने गाव सोडल्यामुळे त्यांची जमीन पडून होती.

१५ वर्षांपासून पडून असलेली ही १५ एकर वादग्रस्त जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जमिनीबाबत वाद असल्याचे माहीत असूनही ती खरेदी करून मशागत सुरू केल्याने तळवार कुटुंबातील लोकांनी हा कट रचून हत्या घडवून आणल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींच्या अटकेनंतरच अचूक माहिती समोर येईल.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून चडचण पोलीस ठाण्याचे अधिकारी, तीन डीएआर तुकड्या आणि चार केएसआरपी तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून या घटनेने विजापूर जिल्हा हादरला आहे.


Recent Comments