Vijayapura

विजापूरमधील ६ जणांच्या हत्येनंतर गोविंदपूर गावात शांतता

Share

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील घडलेल्या हत्याकांडातील शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून चडचण शहरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंदपूर गावात शुक्रवारी दुपारी जमिनीच्या वादातून ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रकांत निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर अत्तार यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अरविंद कटगे आणि जेसीबी चालक संदीप माने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विजापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २०१५ मधील एका जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही जमीन खरेदी केल्याच्या संशयावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. २०१५ मधील एका जुन्या खुनाच्या प्रकरणातील तक्रारदार कल्लाणगौड पाटील यांच्या बाजूच्या लोकांचा या हत्येमध्ये हात असण्याचा संशय असल्याचे आयजीपी संदीप पाटील यांनी सांगितले.

चडचण शहरात हजारो लोकांच्या उपस्थितीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. याप्रकरणी चैतन्यकुमार निराळे यांनी चडचण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ईश्वरगौडा पाटील, अप्पुगौड पाटील यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Tags: