बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बाजारपेठेत गॅस सिलिंडर तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना सिलिंडरसाठी दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.


बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लोकापूर परिसरामध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली असून, गॅस एजन्सीसमोर शेकडो ग्राहक पहाटेपासूनच रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या भागात गॅस सिलिंडरची गाडी आली नव्हती, त्यामुळे आज सकाळी गाडी येताच नागरिकांनी गॅस मिळवण्यासाठी एकच गर्दी केली. लोकापूर जवळील भारत गॅस एजन्सीच्या गोदामासमोर शेकडो महिला आणि नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाजारपेठेत घरगुती सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे आश्वासन सरकार आणि अधिकाऱ्यांकडून वारंवार दिले जात आहे. मात्र, मुधोळमधील ग्रामीण जनतेला वेळेवर गॅस मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि गॅस एजन्सीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येवर त्वरित आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments